आपला जिल्हा

News: पुरंदर येथील विमानतळ व कार्गो सेंटरसाठी लवकरच भूसंपादन: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

पुणे शहराला साजेसे भव्य आणि आधुनिक, पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे टर्मिनल अस्तित्वात आल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद देऊन यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे हे एक महत्वाचे शहर आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपूरे होते. संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे.

महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे. विमानतळावर स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे. एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे. कोल्हापूरलादेखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे रहात आहे. महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्यांना विकसीत करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुरंदर येथील विमानतळ व कार्गो सेंटरसाठी लवकरच भूसंपादन – पुणे वायुसेनेचे केंद्र असल्याने इथली धावपट्टी अनेकदा बंद ठेवावी लागते. त्यामुळे विमानसेवेच्या विस्ताराची गरज लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. उद्योगांना नवी पुरवठा साखळी विकसीत करता येईल आणि रोजगाराला चालना मिळेल असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हे विमानतळ आवश्यक असून त्यामुळे पुण्याच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विमानसेवा क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. देशात गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. सामान्य माणसासाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत हवाई वाहतूक उपलब्ध होत आहे. या विमानतळांचा उद्योगांना लाभ होऊन रोजगारांच्या संधी वाढत आहेत. दळणवळण सेवांच्या विस्तारामुळे उद्योगांनाही चालना मिळते आहे, असेही फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सह सचिव असंगबा चुबा, भारतीय विमान प्राधिकरणाच्या मानव संसाधन विभागाचे सदस्य डॉ. एच श्रीनिवास, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button