आपला जिल्हा

News: मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, दीपक मानकर आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. पुढच्या पिढीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात रहावे आणि याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूस विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठीदेखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार

महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासंदर्भात पवार म्हणाले, अडीच एकर क्षेत्रावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले आहे. याठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. महात्मा फुले वाडा १९९३ मध्ये उभारण्यात आला आहे. दोन्ही भाग एकत्र करून विस्तृत स्वरुपाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा शासनाचा मनोदय आहे. त्यासाठी काही कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागेल. यापूर्वीदेखील काही कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांचा यासाठी विरोध नाही. मात्र त्यांचे चांगले पुनर्वसन व्हावे, त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. रहिवाशांना आवश्यक सुविधा आणि पर्यायी जागा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. राज्य शासन आणि महानगरपालिका मिळून पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकूण पाऊणेचार एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे स्मारक उभारेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्पूर्वी पवार यांनी दोन्ही स्मारकाच्या जागेस भेट देऊन तेथील कामांबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यांनी स्थानिक रहिवाशांशी चर्चादेखील केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button