News: रब्बी हंगाम पीकस्पर्धेत शेतकऱ्यांनी भाग घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्मिती करणे व त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी रब्बी हंगाम २०२३ पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या पीकस्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पीकस्पर्धेमध्ये रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, व जवस अशा पाच पिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पिकाखालील किमान ४० आर क्षेत्र आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल.
शेतकऱ्याचा विहित नमून्यातील अर्ज, ठरवून दिलेले प्रवेश शुल्क, ७/१२, ८ अ उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्यांने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकासा , बँक खाते चेक बुक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी सर्वसामान्य गटासाठी प्रतिपिक ३०० रुपये व आदिवासी गटासाठी प्रतिपिक १५० रूपये प्रवेश शुल्क राहील. तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिकस्पर्धा विजेते निवडण्यात येतील.
सर्वसाधारण व आदिवासी गटांकरीता तालुका पातळीकरीता पहिले ५ हजार रुपये, दुसरे ३ हजार, तिसरे २ हजार रुपये, जिल्हा पातळीकरीता पहिले १० हजार रुपये, दुसरे ७ हजार तर तिसरे बक्षीस ५ हजार रुपये, आणि राज्य पातळीकरीता पहिले ५० हजार, दुसरे ४० हजार, तिसरे ३० हजार रुपये असे बक्षीस असणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीकस्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.