आपला जिल्हा

News: राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 83 हजार दावे निकाली

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष के.पी.नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्याने प्रलंबित ३३ हजार ३५९ आणि दाखलपूर्व ५० हजार ४५८ असे एकूण ८३ हजार ८१७ प्रकरणे निकाली काढण्यात आले. लोकअदालतीमध्ये सर्वाधिक प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने सातत्याने प्रथम क्रमांक कायम राखला असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी दिली आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे तर्फे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ मधील तरतुदी अंतर्गत राज्य, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे व तालुका विधी सेवा समित्याद्वारे अशा प्रकारच्या लोकन्यायालयांचे वेळोवेळी आयोजन करण्यात येते. लोकअदालत किंवा लोक न्यायालय हे एक अनोखे व्यासपीठ आहे जिथे विवाद लवकर आणि परवडण्याजोगे सोडवले जातात.

लोकअदालतीमध्ये मोठ्या प्रमाणात खटल्यांचा यशस्वी निपटारा हा न्यायालयाच्या सक्रिय दृष्टिकोनाचा आणि पारंपारिक न्यायव्यवस्थेवरील भार कमी करण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे. खटल्यांचा अनुशेष कमी करण्यासाठी आणि वेळेवर न्याय मिळेल याची खात्री करण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून लोकअदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायीक अधिकारी, जिल्ह्यातील सर्व तालुका विधीज्ञ संघटना, विविध शासकीय आणि सामाजिक संस्था, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती पाटील यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button