आपला जिल्हा

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास आराखड्यातील मंजूर कामे तात्काळ पूर्ण करावीत: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आराखड्यानुसार मंजूर असलेली सर्व कामे गुणवत्ता राखून तात्काळ पूर्ण करावीत. अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र विकास आराखडा संदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी डुडी बोलत होते.

तीर्थक्षेत्र विकासांतर्गत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, वढू बु. व तुळापूर, मालोजी राजे भोसले यांची गढी व हजरत चाँदशहवली बाबा दरगाह, श्री क्षेत्र जेजुरी गड, सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज समाधी स्थळ, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास, अष्टविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करणे श्री क्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखडा या सर्व आराखड्यांच्या विकास कामांच्या प्रगती बाबत बैठकीत आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी डुडी यावेळी म्हणाले, तीर्थक्षेत्रांच्या विकास कामासंदर्भात मंदिर ट्रस्ट, संस्थान येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन त्यांची मदत घेऊन कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत स्थानिक पातळीवरच्या काही अडचणी असतील त्या प्रशासनातर्फे सोडण्यात येतील, काही ठिकाणी जमीन संपादनासंदर्भात येणाऱ्या अडचणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून प्रक्रिया पूर्ण करावी. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांसाठीच्या आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उत्कृष्ट असल्या पाहिजे, कामे पूर्ण झाल्यावर त्यांची देखभाल व दुरुस्तीसाठी समिती स्थापन करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

भीमाशंकर तीर्थक्षेत्र व परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करावा – नाशिक येथे 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामधील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. भीमाशंकर तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून येथे भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात, भीमाशंकर तीर्थक्षेत्र सर्वात चांगले तीर्थक्षेत्र तयार झाले पाहिजे त्या दृष्टीने या तीर्थक्षेत्राच्या परिसराचा समग्र विकास आराखडा तयार करावा, भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच या परिसरातील विविध देवस्थान, धार्मिक स्थळांची विकास कामे रस्त्याची कामे, येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी, पर्यटनाच्या दृष्टीने देण्यात येणाऱ्या सुविधा पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, इको टुरिझम आदी बाबींचा समावेश या विकास आराखड्यात करुन पुढील दहा दिवसात आराखडा प्रशासनाकडे सादर करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या विशेष विकास आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अगोदर येत्या दोन वर्षात ही कामे पूर्ण झाली पाहिजे. त्यादृष्टीने सर्व संबंधितांनी नियोजन करावे, असे डुडी म्हणाले बैठकीला, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग वनविभाग, संबंधित विभागांचे अधिकारी, मंदिर देवस्थानाचे पदाधिकारी, बांधकाम विकासक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button