आपला जिल्हा

News: अवैध व्यावसायिकांच्या नाडया आवळणार ” व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली ” पुणे ग्रामीण पोलीसांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे ग्रामीण जिल्हयातील सुजाण, जागरूक नागरीकांकडून पोलीस खात्यास नेहमीच सहकार्य लाभले आहे. त्यामध्ये कोणताही कायदा व सुव्यवस्था प्रश्न असेल किंवा सामाजिक, राजकीय, धार्मिक मुद्यांतर्गत तणाव असेल अशा वेळी नागरीकांकडून पोलीस खात्यास योग्य सहकार्य केले जाते.

समाजातील नागरीकांना आपला दिनक्रम तसेच जीवन शांततेत, सुव्यवस्थेत व्यतित करण्यास मिळावे या दृष्टीकोनातून पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी ” व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली ” हा नवीन उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

सध्याचे कालावधीत मोबाईल हा मनुष्याचे जीवनातील एक अविभाज्य घटक झालेला असून याच मोबाईल मधील सोशल मिडीयाचा वापर करून नागरीकांना आपली तक्रार करणे सुलभ होणार आहे. बऱ्याच सुजाण, जागरूक नागरीकांना आजुबाजूला अगर परिसरात असणारे अवैध धंद्यांविषयी तक्रार करावयाची असते, परंतु प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला जावून तक्रार देण्यासाठी त्यांना शक्य होत नाही अगर भिती वाटत असते. त्यामुळे नागरीकांनी पोलीस स्टेशनला न जाता, आहे त्या ठिकाणाहून मोबाईल मधील” व्हॉट्स ॲप” या सोशल मिडीया ॲपचा वापर करून अवैध धंदे व्यवसाय विषयीची तक्रार/माहिती पुणे ग्रामीण पोलीसांना देणे सोयीचे व सुलभ व्हावे याकरीता पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे संकल्पनेतून ” व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली” उपक्रमांतर्गत 9922892100 असा व्हॉट्सॲप मोबाईल नंबर पुरविण्यात येत आहे.

नागरीकांनी 9922892100 हा मोबाईल नंबर आपले मोबाईल मध्ये सेव्ह करून या मोबाईल नंबरचे व्हॉट्स ॲप वर सुरूवातीस Hi असा शब्द/मेसेज पाठवून चॅटींग सूरू करावे. सदर मोबाईल नंबरवरील व्हॉट्स ॲप हे स्वयंचलित असल्याने त्यावरून आपणास प्रतिसाद मिळेल व पुढील पर्याय सुचविण्यात येतील. सदरची प्रणाली ही मराठी मध्ये असून अगदी सोप्या पद्धतीने तिचा वापर करता येणार आहे. या प्रणाली द्वारे नागरीकांना आपले परिसरातील अवैध धंदे अवैध व्यवसायाविषयीच्या तक्रारी पोलीसांना देताना त्यामध्ये अवैध व्यवसाय असलेल्या ठिकाणाचे नाव, अवैध व्यवसाय करणाराचे नाव, फोटो, लोकेशन अशी माहिती देता येणार आहे. सदरचे ठिकाणाबाबत संबंधित पोलीस स्टेशन व पोलीस उपविभागाचे नाव नोंदविणे आवश्यक राहणार आहे. ही सर्व प्रक्रीया प्रणालीद्वारे स्वयंचलित असून तक्रारदार यांचा मोबाईल नंबर तसेच त्यांचे नाव हे पुर्णतः गोपनीय राहणार आहे.

पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे वतीने ” व्हॉट्सॲप दक्ष प्रणाली” उपक्रमांतर्गत 9922892100 हा व्हॉट्स ॲप मोबाईल नंबर नागरीकांसाठी प्रसारीत करून या प्रणालीचा आज शुभारंभ करणेत आला आहे. या प्रसंगी पंकज देशमुख पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक पुणे व बारामती विभाग तसेच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व नागरीकांनी आपापले तसेच आजूबाजूचे परिसरातील अवैध धंदे / अवैध व्यवसायांची माहिती ” व्हॉट्स ॲप दक्ष प्रणाली” उपक्रमांतर्गत पुरविणेत आलेल्या 9922892100 या व्हॉट्स ॲप मोबाईल नंबरवर द्यावी, जेणेकरून अवैध धंद्यांचे अवैध व्यवसायांचे समुळ उच्चाटन करणेकरीता पुणे ग्रामीण पोलीसांना सहकार्य होईल, असे आवाहन पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button