News: जेजुरी : महाशिवरात्री यात्रेच्या अनुषंगाने वाहतुकीत बदल

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): श्री क्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील श्री. खंडोबा देवाचे मंदिर महाशिवरात्र सणा निमित्त गुप्तलिंग दर्शनासाठी वर्षातून एकदाच भाविकांसाठी खुले होत असते. या यात्रेकरीता महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. दि. ०८/०३/२०२४ रोजी महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र जेजुरी येथे मोठया प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर दिवशी महाशिवरात्री यात्रा कालावधी वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून पुणे-जेजुरी- बारामती महामार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक झालेले असल्याचे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी नमूद केले आहे.
आणि ज्याअर्थी, श्रीक्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील श्री. खंडोबा देवाचे मंदिर येथील दि.०८/०३/२०२४ रोजीच्या महाशिवरात्री यात्रा कालावधी वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणून पुणे-जेजुरी- बारामती महामार्गावरील जड, अवजड व इतर वाहनांची वाहतुक बंद करुन ती पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याची माझी खात्री झालेली आहे.

त्याअर्थी मी, डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे मला मोटार वाहन कायदा- १९८८ चे कलम ११५ मधील तरतुदीनुसार व शासन गृह विभागाचे दि. १९/०५/१९९० चे अधिसूचनेनुसार मला प्राप्त अधिकाराने श्रीक्षेत्र जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथील महाशिवरात्री यात्रा कालावधी वाहतुक कोंडी होऊ नये व कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी म्हणून दि. ०८/०३/२०२४ पहाटे ०:०० वाजले पासून रात्री २४:०० या कालावधीत पुणे-जेजुरी- बारामती महामार्गावरील जड-अवजड व इतर वाहतुक बंद करुन ती खालील पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश देत आहे.
- जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतुक पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे
१. सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथुन पुणे येथे जाणेकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड, अवजड व इतर वाहतुक पुर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने निरा-मोरगाव-सुपा-केडगाव चौफुला मार्गे सोलापुर महामार्गाने पुणे या मार्गे वळविण्यात येत आहे.
२. पुणे बाजुकडुन बारामतीकडे जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद करुन ती बेलसर-कोथळे-नाझरे- सुपे-मोरगाव रोडमार्गे बारामती/फलटन साताराकडे जातील.