News: कौतुकास्पद! जेजुरी देवसंस्थानच्या कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; भाविकांना परत मिळाले दहा लाखांचे दागिने

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलेची पर्स गड परिसरात विसरून राहिली. श्री मार्तंड देवसंस्थानच्या कर्मचाऱ्यांना ही पर्स आढळून आली. या पर्स मध्ये दहा लाख रुपये किमतीचे सोने व रोख दहा हजार रुपये होते. या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक पणा मुळे सदर महिलेस आपले दागिने व पैसे परत मिळाले.
या बाबत माहिती अशी की सोमवार दिनांक 20 रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सेवा निवृत्त प्राध्यापिका डॉ. सुधा माळधुरे या आपल्या परिवारासह कुलदैवत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर आल्या होत्या. देवदर्शन करून जात असताना गडाच्या पाठी मागील बाजूस असणाऱ्या स्वच्छता गृहात जाताना त्यांनी स्वतः जवळची पर्स घोड्याच्या पागेच्या भिंतीवर ठेवली. मात्र जाताना ही पर्स विसरून या महिला आपल्या परिवारासह निघून गेल्या.

जेजुरी देवसंस्थानचे कर्मचारी सुनील भोसले व बाळासाहेब पाठक यांना घोड्याच्या पागे जवळ ही पर्स आढळून आली. या दोघांनी ही पर्स देवसंस्थान कार्यालयात जमा केली. या बागेत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व कागदपत्रे आढळून आली. या कागदपत्रे, आयकार्ड वर असणाऱ्या मोबाईल नंबरहून संपर्क साधला असता सदर भाविक सासवड पर्यंत आले होते. ते परत जेजुरी गडावर आले. त्यांना त्यांची पर्स परत करण्यात आली. पर्स मिळताच त्यांनी समाधान व्यक्त केले. पर्स मध्ये सुमारे दहा लाख रुपये किमतीचे दागिने व दहा हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले.

भाविक महिलेचा अभिप्राय
सुनील भोसले व बाळू पाठक यांनी माझी हरवलेली बॅग मला फोंन करून कळवून परत दिली. या मध्ये दहा लाख रुपये किमतीचे दागिने व दहा हजार रुपये होते.असे प्रामाणिक कर्मचारी आपल्या देवसंस्थान मध्ये आहेत.ही आपणासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे.आपल्या सर्व जागृत कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. माणसांच्या रूपातच देव भेटतो याचा आज अनुभव आला. असा अभिप्राय डॉ सुधा माळधुरे यांनी दिला.
सुनील भोसले आणि बाळासाहेब पाठक यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक व अभिनंदन श्री मार्तंड देवसंस्थान प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त अँड पांडुरंग थोरवे, मंगेश घोणे, डॉ राजेंद्र खेडेकर, पोपट खोमणे, अनिल सौंदडे, विश्वास पानसे व्यवस्थापक आशिष बाठे यांनी केले.