News: ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : जिल्ह्यातील ६५ वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र आदीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’चा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी- ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इ. सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येणार आहेत. मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी योगोपचार आदीचा लाभ घेता येईल.

योजनेसाठी नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाद्वारे एकवेळ एकरकमी ३ हजार रुपयांच्या मर्यादेत ऑफलाईन पद्धतीने वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेसाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे. पात्र अर्जदारांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यासमोर, येरवडा पुणे- ०६ (दूरध्वनी क्रमांक ०२०-२९७०६६११ (ईमेल-acswopune@gmail.com) येथे सपंर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.