News: श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी कडून पत्रकारांचा सन्मान

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत पत्रकार दिनानिमित्त मार्तंड देव संस्थान जेजुरी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये सर्व पत्रकारांना शाल व गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

दरवर्षी लाखो लोक कुलधर्म, कुलाचार व दर्शनासाठी जेजुरी नगरीत येत असतात. या सर्वांना विविध सुख – सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच खंडोबा मंदिर व जेजुरी शहराचे महत्व, प्रसिद्धी वाढीस लागण्यासाठी नवनवीन उपाय योजना तसेच प्रकल्प राबवण्याचे मानस सुद्धा मार्तंड देवस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी व्यक्त केला. यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे येत्या उन्हाळ्यात येणाऱ्या भाविकांना पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता असल्याने त्याबाबत सुद्धा उपाय योजना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. येणाऱ्या काळात भाविकांसाठी सुलभ दर्शन, भव्य पार्किंग व्यवस्था तसेच सोमवती पालखी मार्ग इत्यादी प्रकल्प मार्गी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी जेष्ठ पत्रकार प्रकाश खाडे, नितीन राऊत, विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच देवस्थानच्या वतीने विश्वस्त पोपट खोमणे, डॉ. राजेंद्र खेडेकर व प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी मार्तंड देवस्थानच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. यावेळी विश्वस्त मंगेश घोणे, ऍड, विश्वास पानसे, एड. पांडुरंग थोरवे, आणि अनिल सौंदडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्तंड देव संस्थांनचे व्यवस्थापक आशिष बाठे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळा खोमणे व इतर कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.