News: नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत: जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार यादीमध्ये नांव असणे आवश्यक असल्याने, वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांनी आपले नाव प्राधान्याने मतदार यादीत समाविष्ट करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले आहे.
ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही १९ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे, तरी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करावी .जेणे आपल्याला मतदानाचा पवित्र हक्क बजावता येईल.

नागरिकांना निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाईन ॲपद्वारे घरबसल्या मतदार यादीमध्ये नांव नोंदणी करता यईल. यासाठी वयाचा आणि निवासाचा पुरावा आवश्यक आहे. ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांनी मतदार यादीमध्ये नांव नोंदवावे. मतदारांनी मतदार यादीमध्ये आपले नांव यादीत आहे किंवा नाही याची खात्री https://electoralsearch.eci.gov.in या संकेतस्थळावर करावी. मतदार यादीत नाव नसल्यास अर्ज क्र. ६ भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे १९ ऑक्टोबर पर्यंत सादर करावा, असेही आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.