आपला जिल्हा

News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमात महिलांचा आनंदोत्सव

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या निमित्ताने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर महिला भगिनींनी फुलला होता. सर्वत्र महिलांचे आनंदी आणि उत्साही चेहरे दिसत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीने उपस्थित महिला भगिनी भारवल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळालेली रक्षाबंधनाची ओवाळणी कायम स्मरणात राहणार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केल्या. सांस्कृतिक कार्यक्रमाच्यावेळी त्यांनी केलेल्या जल्लोषाने त्यांना झालेला आनंद दिसून आला.

पिंपरीच्या संगीता विलास वाकोडे यांनी मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधन सण गोड केला अशा शब्दात उत्स्फूर्तपणे आपल्या भावना व्यक्त केला. मुलांसाठी दोन पैसे अधिक खर्च करता येतील, असे त्या म्हणाल्या.

ढोल ताशांचा गजर, लेझीम पथके, महिलांच्या मनोरंजनासाठी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम आणि संगीताचे सूर असे घरगुती समारंभाचे स्वरुप अनुभवतांना महिलांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. शासनाने सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधनपूर्वी योजनेत रक्कम जमा झाल्याने शासनाविषयी विश्वासाची भावनाही कार्यक्रमात दिसून आली. आताप्रमाणे दर महिन्यात रक्कम जमा होईल याची खात्री आहे अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.

राज्यातील महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आत्मनिर्भर करणे, महिलांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी शासनाने सुरु केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे थेट महिलांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याने कुटुंबातील आमची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने महिलांना दिलेला आधार खूप मोलाचा आहे. लाडक्या बहिणींना हक्काचा आधार दिला असल्याच्या प्रतिक्रियाही महिलांनी दिल्या.

या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना सुरु केल्याने शासनाचे आभार मानत व रक्कम जमा झाल्याचा मोबाईल संदेश मोठ्या उत्साहाने महिला एकमेकींना दाखवत होत्या.

मुळशी तालुक्यातील नांदगाव येथून आलेल्या मनीषा वसंत भालेकर म्हणाल्या, मी गृहिणी आहे. या योजनेत मिळालेल्या रकमेमुळे अडचणीच्या वेळेला कुटुंबाच्या खर्चासाठी उपयोग होईल. माझ्या स्वतःसाठीही काही खर्च करता येईल. दर महिन्याला हक्काचे पैसे मिळणार असल्याने आमच्या संसाराला आधार झाल्याचे पेरणेगाव येथून आलेल्या निर्मला कानिफनाथ वाळके यांनी सांगितले. रक्षाबंधनाला मुलांसाठी गिफ्ट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवरीच्या मनीषा सुभाष सावंत यांनी योजनेमुळे मुख्यमंत्र्यांची बहीण झाल्याचा आनंद व्यक्त केला. लसूण विक्रीचा व्यवसाय वाढविण्यास हातभार लागू शकेल याचा आनंद त्यांना होता. शासनाने लाडक्या बहीण योजनेत मला हक्काचे पैसे दिले असून मला बहिणीचा मान दिला आहे. त्या रकमेचा उपयोग मी मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे, असे जांभेगावच्या रेश्मा मोहंमद शेख यांनी सांगितले.

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीच्या ममताबाई जारकड व रत्नाबाई भोजने या शेतात काम करत असल्याने ही रक्कम आमच्यासाठी खूप मोलाची असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागापर्यंत ही योजना पोहोचली याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अशा अनेक चांगल्या प्रतिक्रिया कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी व्यक्त केल्या. शासनाची ही भेट त्यांच्यासाठी अमूल्य असल्याचे दिसून आले आणि त्यामुळेच शासनाला त्यांनी धन्यवादही दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button