महाराष्ट्र

News: वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत असणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, गरीब महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे तसेच पर्यावरणाची हानी टाळणे याबाबींचा विचार करुन राज्य शासनाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सुमारे ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात येईल. या योजनेचा १ जुलै २०२४ पासून प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांची पात्रता: योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता पात्र ठरणारे लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. शिधा पत्रिकेनुसार एका कुटुंबातील केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. सदरचा लाभ केवळ १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ १ जुलै २०२४ रोजी पासून देण्यात येणार असून त्यानंतर विभक्त करण्यात आलेल्या शिधापत्रिकातील कुटुंबास लाभ मिळणार नाही.

योजनेची कार्यपद्धती- मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या ३ मोफत सिलेंडरचे तेल कंपन्यांमार्फत वितरण करण्यात येणार आहेत. सद्यःस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर अंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी ८३० रुपये असून ती ग्राहकांकडून घेतली जाते. त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी ३०० रुपयाचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेंतर्गत तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे ५३० रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करायची आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही.

योजनेची प्रभावी अंमलबजावणी, ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणे, तेल कंपन्यांना करावयाच्या प्रतीपूर्ती संदर्भातील तक्रारीचे निराकरण करणे तसेच योजनेच्या एकूण संचालन व समन्वयासाठी नियंत्रक, शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येणार आहे.

शासनाने महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजना, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थीनींना मोफत प्रवेश अशा विविध योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना याच श्रृंखलेतील महिला सक्षमीकरण आणि त्यांचे जीवनमान उंचावणारी एक योजना ठरणार आहे.

डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी: जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे १ लाख ५४ हजार ५६० लाभार्थी तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाला १ जुलै २०२४ पासून एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी, सहायक अन्नधान्य वितरण अधिकारी, तहसिल कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नजीकच्या रास्तभाव दुकान, गॅस वितरण केंद्राशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button