आपला जिल्हा

News: जेजुरी: राष्ट्रीय महामार्ग क्र. 965 रुंदीकरणासाठी घरे, दुकाने हटवली

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ रुंदीकरणाचे काम सुरू आहे. काल जेजुरी शहराअंतर्गत रुंदीकरणाच्या मार्गात बाधित होणारी घरे-दुकाने हटविण्याचे काम सकाळ पासूनच सुरू होते. या कामासाठी पोलिस प्रशासन, नगरविकास, महसूल, महावितरण, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारीवर्गासह मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून पुणे ते पंढरपूर पालखी महामार्ग (क्र. ९६५) रुंदीकरणाचे काम सुरू आहे. जेजुरी शहराअंतर्गत उत्तर दिशेला असणाऱ्या नागरिकांची घरे-दुकानांचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. वर्ष २०१५ मध्ये राज्य मार्गाचे रुंदीकरण करताना उत्तर दिशेकडील व्यावसायिक व रहिवासी यांची घरे, दुकाने हटवून रुंदीकरण करण्यात आले होते.

त्यावेळी संपादित केलेल्या जागेचा व तोडण्यात आलेली दुकाने यांची कोणतीही नुकसान भरपाई बाधितांना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे पुन्हा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरण करताना उत्तर दिशेला जास्त जागा संपादित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष होता. उत्तर व दक्षिण दिशेला समसमान रुंदीकरण व्हावे व दोन्ही बाजूंना समसमान संपादन व्हावे, अशी मागणी नागरिकांची होती. यासाठी गतवर्षी २५ ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मार्च २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढल्यामुळे जागा संपादनाचा मार्ग मोकळा झाला होता.

यामध्ये जेजुरी बसस्थानक ते मोरगाव रोड या मार्गातील उत्तर दिशेकडील दुकाने-घरे हटविण्यास सुरुवात झाली. या कार्यवाहीसाठी उपजिल्हाधिकारी प्रसाद चौगुले, राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अभियंता दीपक आवटे, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार विक्रमसिंह राजपूत, पालिका मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले, पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासह सुमारे १०० पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button