Big news : पुरंदर ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी तीन वरिष्ठ अधिकारी निलंबित; केंद्रीय निवडणूक आयोगाची कारवाई

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुरंदर ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या तीनही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करून मुख्य सचिवांनी तत्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून, तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सासवड तहसील कार्यालयातून चोरीला गेलेले ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरीला गेल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासांत 2 चोरांना या प्रकरणी अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये या व्यतिरिक्त आणखी कोण सामील आहेत का? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉग रूमचे कुलूप तोडलेले आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीनमधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचे समजताच एकच खळबळ उडाली होती.