News: जेजुरी श्रीमार्तंड भैरव महाराजांची चैत्र षड:रात्रोत्सवानिमित्त पत्रीपूजा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत श्री क्षेत्र जेजुरी गडावर आज श्रीखंडोबा म्हाळसादेवी स्वयंभू लिंग व श्रीमार्तंड भैरव महाराजांची चैत्र षड:रात्रोत्सवानिमित्त पत्रीपूजा करण्यात आली.
कैलासावर सप्तऋषींच्या मुखातून मणीमल्लासूराच्या अन्यायकारक कथा ऐकल्यानंतर श्रीशंकर महादेवांनी श्रीमार्तंड भैरव अवतार धारण केला तो कालावधी म्हणजे चैत्र महिन्यातील श्रीमल्हारी मार्तंड षड:रात्रोत्सव. या कालावधीमध्ये श्रींना दररोज पहाटेची तोंडधुनीची पूजा झाल्यानंतर श्रीमार्तंड देवस्थान मुख्य गुरव पुजारी, मेघमल्हार प्रतिष्ठान आणि मार्तंड देवसंस्थानच्या वतीने सहा दिवस वेगवेगळ्या पूजा केल्या जातात.

त्यामध्ये पुष्पपूजा, बिल्वपूजा, पत्रीपूजा, भंडारपूजा, चंदनपूजा आणि दवणापूजा अशा पूजा आणि सजावट केली जाते. त्यापैकी आज पत्रीपूजा करण्यात आली. ज्यामध्ये चैत्र पालवी फुटलेल्या विविध वृक्षवेलींच्या पानांचा वापर करण्यात आला अशी माहिती अण्णाश्री उपाध्ये गुरुजी यांनी दिली.
यावेळी मार्तंड देव संस्थांनच्या वतीने विश्वस्त मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडेकर उपस्थित होते. तर मुख्य गुरव पुजारी अविनाश सातभाई, नितीन बारभाई, सचिन आगलावे, दिडभाई आणि अण्णाश्री उपाध्ये गुरुजी, वारकरी सोमनाथ उबाळे, संजय घोणे, जाधव उपस्थित होते. सदर पूजेसाठी लागणारी सामग्री किरण कुदळे, दिलीप माने, जयकुमार चौंडकर यांनी उपलब्ध करून दिली.