News: जेजुरी: सोमवती यात्रेनिमित्त लाखों भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत अमावस्ये निमित्त भरलेल्या सोमवती यात्रेत सुमारे 2 लाखांवर भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती. सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार च्या जयघोषात मुक्त हस्ताने भंडार खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले.
सोमवती अमावस्ये निमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून भाविक जेजुरीत आले होते.काल पासूनच जेजुरीत गर्दी केली होती. आज दिवसभर अमावस्येचा पुण्यकाल असल्याने दुपारी १ वाजता पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आला. पेशव्यांच्या इशारतीत आणि बंदुकीच्या फैरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली. पालखीचे मानकरी, खांदेकऱ्यांनी देवाची पालखी उचलली. मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत नेण्यात आली. देवाच्या सेवेकऱ्यांनी उत्सवमूर्ती पालखीत स्थानापन्न केल्या. आणि निघाला देवाच्या उत्सवमूर्तीचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी गडकोटा बाहेर पडला. यावेळी देवसंस्थान चे मुख्य विश्वस्त, व्यवस्थापक, कर्मचारीआणि लाखों वर भाविक उपस्थित होते.

गडकोटाबाहेर सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यानंतर पायरी मार्गाने ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मंदिर मार्गे जानुबाई चौकातून सोहळ्याने शिवाजी चौक मार्गे कऱ्हा नदीकडे प्रस्थान केले. सायंकाळी ५.३० वाजता सुमारास देवाच्या उत्सवमूर्तीचे कऱ्हा स्नान उरकून सोहळा माघारीचे प्रस्थान होणार आहे.
विधिवत उत्सवमुर्तीसह भाविक भक्त ही स्नानाची पर्वणी लुटतात. त्यानंतर पुन्हा धालेवाडीकरांचा मान घेत पालखी सोहळा, फुलाई माळीण कट्टा, जानाई मंदिर कट्टा येथे स्थिरावून नगरीच्या मुख्य चौकातून गटकोटात दाखल होतो आणि रोजमारा (चिमुटभर तृणधान्य) वाटप होऊन सोहळ्याची सांगता होते. राज्यातून आलेले भाविक भक्त कन्हा स्नानाची पर्वणीसह जागरण गोंधळ, दिवटी पाजळणे, कोटंबा पुजणे व तळी भंडार करीत आपला कुलधर्म कुलाचार श्रध्दापूर्वक केला जातो.