आपला जिल्हा

News: विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांकडून परिसरातील सुविधांचा आढावा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला.

यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बार्टीचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण,निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शिक्रापूर येथील वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसेसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या.

सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज – विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. २९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. २० फिरते दूचाकी आरोग्य पथक, ५० रुग्णवाहिका ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. खाजगी रुग्णालयात १०० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पुरेशा प्रमाणात औषधसाठादेखील ठेवण्यात आला आहे.

स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या माता-भगिनींची काळजी घेण्यात आली असून एकूण पाच हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहेत. हिरकणी कक्षामध्ये स्तनदा माता व ज्येष्ठ महिला यांना तसेच त्यांच्या समवेत असलेले लहान बालकांसाठी विश्रांती तसेच बालकांच्या मनोरंजनाकरीता खेळणी साहित्य व खाऊ ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परिसरातील विविध ठिकाणी एकूण २ हजार २०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. वापराच्या पाण्यासाठी ४० टँकर आणि स्वच्छतेसाठी ४० सक्शनमशीन व १५ जेटींग मशीन ठेवण्यात आले आहेत. रस्त्यावर कचरा साचू नये याकरीता ५०० कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी २०० सफाई कामागार नियुक्त करण्यात आले आहेत. कचरा उचलण्याकरिता ८० घंटागाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना सुचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था ( पब्लीक ॲड्रेस सिस्टिीम) करण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारे परिसरावर नजर राहणार असून त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्तांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा – पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करुन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.

ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टी संस्थेचे महासंचालक सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून विजयस्तंभ परिसरात बार्टी संस्थेच्यावतीने पुस्तकांचे ३०० स्टॉल उभारले आहेत. बार्टी संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके ८५ टक्के सवलतीच्या दरात अनुयायांना वितरण करण्यात येणार आहेत.

‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी, भारताचे संविधान, संविधान उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बुद्ध आणि त्याचा धम्म आदी पुस्तके उपलब्ध असून अनुयायांनी बार्टीच्या दालनाला भेट देऊन या पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केले आहे.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण – सोहळ्यास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सोहळा पाहता यावा यासाठी सह्याद्री वाहिनीवरून १ जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० वाजता मान्यवर पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील. ७.३० वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली जाईल. सकाळी ९.३० वाजता ‘डॉ.बी.आर. आंबेडकर विज्डम बुकफेअर’चे उद्घाटन होईल, अशी माहिती बार्टीच्यावतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button