आपला जिल्हा

News: बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध प्रशासनाच्यावतीने धडक कारवाई: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज) : पुणे शहरातील सर्वे क्रमांक ५७९/१ ब, मौजे बिबवेवाडी येथे पर्यावरणाचा ऱ्हास करुन अनधिकृतपणे डोंगरफोड करणाऱ्या विरुद्ध प्रशासनाने धडक कारवाई केली आहे; यापुढे अनधिकृतपणे उत्खनन करुन पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

मौजे बिबवेवाडी येथे अनधिकृतपणे डोंगरफोड करुन जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरु असल्याबाबतची माहिती प्रशासनाला मिळाली; या ठिकाणी प्रशासनाच्यावतीने ड्रोनद्वारे स्थळ पाहणी करुन पंचनामा केला. या ठिकाणी अनधिकृत उत्खनन व डोंगरफोड करुन जागा सपाटीकरण होत असल्याचे निदर्शनास आले आणि प्रशासनाच्यावतीने ते तात्काळ थांबविण्यात आले. याकामी वापरण्यात आलेले पोकलँड हुंडाई टू टेन ताब्यात घेण्यात आले आहे. या मिळकतीचे मालक राकेश शर्मा असून त्यांनी व विकसकानी उत्खनन तसेच जागा सपाटीकरणाकरीता शासनाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे कार्यवाहीत निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या कारवाईत हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, पुणे शहर तहसीलदार सूर्यकांत येवले,हवेली तहसीलदार किरण सूरवसे, मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी एकत्रितपणे कार्यवाही केली आहे, अशी माहिती डुडी यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button