क्राईम

Crime News: पालखी महामार्गावर जेजुरीतील बेलसरफाटा येथे एसटी बस-दुचाकीच्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी नजीक पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर सासवड- जेजुरी रस्त्यावरील बेलसर फाटा येथे एसटी बसचा आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १६) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची जेजुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

रमेश किसन मेमाणे (वय ६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (वय ४०) व पांडुरंग दामोदर मेमाणे (वय ६५, तिघे रा. बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी मृतांची नावे आहेत. रमेश मेमाणे, संतोष मेमाणे आणि पांडुरंग मेमाणे हे तिघे जण दुचाकीवरून जात होते.

सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर फाट्याजवळील रस्ता ओलांडून जात होते. त्या वेळी एसटी बस त्यांच्या दिशेने भरधाव वेगाने आली. अचानक आडवे आलेल्या दुचाकीला पाहून चालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वरील तिघेही दुचाकीसह बसखाली सापडले. यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तिघांना जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. एकाच वस्तीवरील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने पारगाव मेमाणे गावावर शोककळा पसरली आहे.

सदरचा अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button