News: देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान: राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान
असून सशस्त्र दल आणि देशासाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून ही प्रशिक्षण संस्था ओळखली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.
खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे पंचेचाळीसाव्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात (पासिंग आऊट परेड) मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. तसेच पाचव्या बटालियनच्या इमारतीच्या आगामी बांधकामाची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली.
यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल ए के सिंह, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट व्हॉईस अडमिरल अजय कोच्चर यांच्यासह संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की,राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, एनडीए हा नेतृत्वाचा पाया आहे; ज्यातून महान योद्धे तयार झाले आहेत. एनडीएकडून मिळालेले प्रशिक्षण आणि जीवनमूल्ये उत्तीर्ण छात्रांना (कॅडेट्स) आयुष्यात प्रगती करण्यास सहाय्य करतात, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी कॅडेट्सना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब करून अग्रेसर रहाण्याचे आवाहन केले. सशस्त्र सेवेतील मूल्यांचे अनुसरण करून ते प्रत्येक आव्हानाला धैर्याने आणि शौर्याने सामोरे जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
एनडीएच्या पासिंग आऊट परेडमध्ये संचलन करणार्या दलाच्या रूपात प्रथमच महिला कॅडेट्सचा सहभाग पाहून राष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. हा दिवस खर्या अर्थाने ऐतिहासिक असल्याचे त्या म्हणाल्या. भविष्यात सर्व महिला कॅडेट्स देश आणि एनडीएला नव्या उंचीवर घेऊन जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी भारताच्या सीमांचे संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा आवश्यक असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ या परंपरेचे पालन करतो, परंतु, देशाच्या एकता आणि अखंडतेच्या भावनेला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सक्षम आणि सदैव तयार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे नमूद केले.