News: जेजुरीत जिजामाता संकुलात ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमास सुरुवात

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड, संचलित जिजामाता प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संस्कारमय विद्यार्थी घडविण्यासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा उपक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी व ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या वतीने सुरु करण्यात आला असून दर शनिवारी विद्यार्थांकडून हरिपाठ व श्लोक पाठांतर करून घेतले जाणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे महाराज यांनी दिली.

यावेळी ज्ञानेश्वरी ग्रंथ व हरिपाठ पुस्तक वाटप वाटप कार्यक्रम घेण्यात आला.प्रथमता श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे, प्रकाश काळे, अर्जुन मेदनकर, श्रीधर गुंडरे, विश्वंभर पाटील, रमेशनाना उबाळे महाराज, शंकर आण्णा म्हस्के महाराज, गोपाळ मोहरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाला दहा ज्ञानेश्वरी ग्रंथ व इयत्ता तिसरी ते आठवी या वर्गातील विद्यार्थांना हरिपाठ पुस्तक वाटप करण्यात आले. प्राचार्य नंदकुमार सागर व समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात प्रकाश काळे म्हणाले की, ज्ञानेश्वरी ही जगाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींनी ७३४ वर्षांपूर्वी सांगितली. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तत्वज्ञान, संत साहित्य हे आपल्या जीवनाला आकार देत असतात. ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव पाषष्टी आदी संत साहित्य आपण वाचले तर नक्कीच आपल्या जीवनात बदल होईल.माऊलींचे साहित्य फक्त वाचन करण्यासाठी नाही तर ते आत्मसात करण्यासाठी असून ते जगाला वाचविण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. एक आदर्श व्यक्ती घडवण्याच्या उद्देशाने ओळख श्री ज्ञानेश्वरी’ची या संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे विचार शाळेतील मुलांना दिले जात आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सानि वर्षा निमित्त श्रीं ची प्रतिमा शाळेस भेट देत श्रीं ची पालखी जेजुरीतून वारीसाठी पंढरपूरला जात असताना शालेय मुलांनी हरिपाठाने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याचे आवाहन प्रकाश काळे यांनी केले.

सूत्रसंचालन सागर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतिश पिसाळ, शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे, छाया पोटे, लीना पायगुडे, माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप, सोमनाथ उबाळे, राजेंद्र ताम्हाणे, राघू हारुळे, अजय जगताप, योगेश घोरपडे, कैलास सोनवणे, कुलदीप साळवे, महेश खाडे, मयूर जगताप,बमीना भैरवकर, निर्मला निगडे, सारिका कामथे, सीमा राणे, छाया साबळे, अमृता कांबळे यांनी केले.