जेजुरी: श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ…

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा पालखी सोहळा सोमवती यात्रेनिमित्त आज सकाळी कऱ्हा स्नानासाठी मार्गस्थ झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती.

सकाळी सात वाजता देवाचे मानकरी असणाऱ्या पेशवे, खोमणे व माळवदकर यांनी सूचना करताच श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा काढण्यात आला. यावेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. मंदिर प्रदक्षिणानंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. पालखी सोहळा कऱ्हा स्नानासाठी गडावरून मार्गस्थ होताना हजारो भाविकांनी येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत खंडोबा देवाचे लेणे असणाऱ्या भंडाराची मुक्त उधळण केली.

पायरी मार्ग उतरून ऐतिहासिक छत्री मंदिर मार्गे पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला. या पालखी सोहळ्यात पालखी सोहळ्याचे खांदेकरी, मानकरी, पुजारी सेवक वर्ग, विश्वस्त, ग्रामस्थ व मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. तसेच या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.