News: जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे मार्च २०२५ च्या अगोदर पूर्ण करा: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जल जीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेलेली कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने टप्प्याटप्प्याने मार्च २०२५ पूर्वी पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग १ चे कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा, विभाग २ चे पुरूषोत्तम भांडेकर, जिल्हा परिषदेच्या उपकार्यकारी अभियंता मनस्वी वाढवळ आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, जमीनीच्या उपलब्धतेमुळे योजनांची कामे अपूर्ण ठेवू नयेत. योजनेच्या कामासाठी जमीन हस्तांतरणाच्या समस्या असलेल्या ठिकाणी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढावा. जागा देण्याबाबत किंवा योजनेच्या कामात समस्या येत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये तहसीलदारांच्या उपस्थितीत ग्रामसभा बोलावून ठराव मंजूर करून पुढील कार्यवाही करावी. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी १५ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर, १५ डिसेंबर, ३० डिसेंबर अशा प्रकारे नियोजन करून उद्दिष्ठ पूर्ण करावे.
प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनांची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. कामे प्रलंबित राहण्याशी संबंधित असलेल्या विभागांना बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी जिल्ह्यातील सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची माहिती दिली. सर्व स्तरावर समन्वय ठेवून कामे तातडीने पूर्ण करावीत. एकही काम प्रलंबित राहणार नाही तसेच सर्व अपूर्ण कामे जास्तीत जास्त जानेवारी पर्यंत पूर्ण होतील याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कार्यकारी अभियंता पाथरवट यांनी ‘जल जीवन मिशन- हर घर जल’ अंतर्गत सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. जिल्ह्यात पाणी पुरवठ्याच्या १ हजार २३९ योजना सुरू असून त्यापैकी ३४९ योजना १०० टक्के पूर्ण झालेल्या आहेत तर ४९१ ठिकाणी पाणी पुरवठा सुरू झालेला आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या एकूण १६८ योजना सुरू असून त्यापैकी ५ योजना पूर्ण झालेल्या आहेत. ४८ योजनांची प्रगती ७५ टक्के ते ९९ टक्के झाली असून ७९ योजनांची भौतिक प्रगती ५० टक्के ते ७५ टक्केदरम्यान आहे. उर्वरित योजनांची प्रलंबित कामे लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे श्री. नाडगौडा यांनी सांगितले.